श्री गुरूदेवदत्त भाग- 2 औदुंबर हे दत्ततीर्थक्षेत्र श्री नृसिंहसरस्वतींच्या वास्तव्याने पावन झाले आहे. अनेक साधूसंतानी या स्थानाची महती गायिली आहे. संतश्रेष्ठ जनार्दनस्वामी, संत एकनाथ यांनी येथे येवून दत्तदर्शन घेतल्याचे पुरावे त्यांच्याच अभंगातून सापडतात.
विदर्भप्रांती कारंजे गावी जन्मलेला नरहरी. बालपणापासून विरक्त वृत्तीचा. तपश्चर्या करून भगवद्प्राप्ती साधावी, असे नरहरीला वाटे. त्यासाठी ते काशीक्षेत्री गेले. श्रीकृष्णसरस्वतींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि श्रीनृसिंहसरस्वती नाव धारण केले. त्यानंतर तीर्थाटन करीत स्वामी औदुंबर या पवित्रा एकांतस्थानी आले. या स्थानी त्यांनी कुणासही आपली ओळख त्यांनी सांगितली नाही. पण, श्रीगुरूंचा गुप्तवास प्रकट केला तो भुवनेश्वरीदेवींनी.
ब्राम्हणकुमाराचा उध्दार केल्यानंतर श्रीगुरूंची किर्ती दशदिशात पसरली. भाविकांची येथे दर्शनासाठी मोठ रीघ लागली. पण, थोड्याच दिवसात श्रीगुरू येथील अनुष्ठान संपवून नृसिंहवाडीला निघाले. भाविकांचा दुःखावेग दाटून आला. त्यावेळी श्रीगुरूंनी
येथे औदुंबरतळी सुरेखा
असतील माझ्या विमल पादुका
दर्शन घडता भक्तभाविका
विमल सुखा देईन मी
असे आश्वासन दिले आणि श्रीगुरू येथून निघाले. त्याच पादूकांचे औदुंबर हे पवित्रस्थान. पूर्वी येथे अंकलखोपच्या देशपांडे यांनी बांधलेली लहान घुमटी होती. सन 1870 च्या सुमारास पुण्याचे (कै) अण्णासाहेब बापट यांनी सद्याचे सुबक मंदिर बांधले आहे. मुंबईच्या प्रभाकर रानडे यांनी भाविकांच्या सहाय्याने मंदिरापुढे 1956 ला सभामंडप बांधला आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी 1826 च्या सुमारास गिरनार पर्वतावर तपश्चर्या करणारे महानयोगी श्री ब्रम्हानंद दत्तगुरूंचा दृष्टांत झाल्यामुळे औंदुबरी आले. येथे मठ बांधून त्यांनी तपश्चर्या सुरू केली. त्यांना येथेच दत्तदर्शन झाल्याने त्यांनी 1842 ला समाधी घेतली. त्याच्या शेजारीच शिवशंकरानंद आश्रम आहे.
औदुंबबरवृक्षांच्या दाट छायेमुळे हे तीर्थस्थान औदुंबर नावानेच प्रसिध्दीस आले. येथे कवी सुधांशू आणि त्यांचे सहकारी सदानंद साहित्य मंडळे चालवत आहेत.
No comments:
Post a Comment