
दत्तजयंतीचा हा उत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत असा दहा दिवस साजरा होतो. दत्तजन्माचा काळ म्हणून संपूर्ण मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो आणि ते पावित्र्य काटेकोरपणे पाळले जाते. नुकताच चातुर्मास संपलेला असल्याने विविध धार्मिक विधीसाठी भाविक येथे मोठ्या प्रमाणावर येतात. तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. या क्षेत्री विवाहानंतरचे उपनयन विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात.
मार्गशीर्ष पौर्णिमा. योगिराज श्रीगुरू दत्तात्रेयांचा जन्मदिवस. कोटी कोटी हृदयांचा आनंद दिवस. कृष्णेच्या काठावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे फुलतो हा आनंद मेळा. दिवसभर दत्तनामाचा गजर सुरू असतो. माध्यान्हीच्या समयी श्रींच्या महापूजेला प्रारंभ होतो. उष्णोदक स्नान, पंचामृत स्नान, श्री रुद्रसूक्त सकृत आवर्तन घातली जातात. गंधपुष्प नैवेद्यानंतर आरती सुरू होते आणि मंत्रपुष्पांजलीने महापूजा संपन्न होते. दुपारनंतर येथे सुरू होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेतात. सायंकाळनंतर चांदीचा पाळणा सजवून मुख्य मंदिरात आणला जातो. समारंभपूर्वक श्रींची उत्सवमूर्ती मंदिरात आणली जाते. फुलांनी सुशोभित झालेले मंदिर श्रीगुरुरायांच्या स्वागताला सज्ज होते आणि पाळणा सुरू होतो-
फुलाफुलांनी सुगंध उधळा
विमल जलांनो सहर्ष उसळा
पवनलहरींनो मंगलवार्ता कळवा ग्रामोग्रामी
अनसूयेचे धामी आले त्रैलोक्याचे स्वामी
श्री अत्री ऋषी आणि महासती अनसूयेच्या पोटी श्री दत्तावतार झाला. हाच तो दिवस ज्या दिवशी त्रिगुणाचे तेज पृथ्वीवर फाकले. अंधारात चाचपडणाऱ्या लाखो जिवांना या तेजाने जीवनाचा मार्ग दाखवला. सृष्टिकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारक शिव हे तीनही देव एक झाले. द्वैत-अद्वैताचा भेद उरला नाही. जे ब्रह्मरूप आहे, तेच विष्णुमय आहे. तेच शिवस्वरूपही आहे. हेच सत्य आहे, शिव आहे आणि सुंदरही आहे. हे अंतिम ज्ञान ज्यांना लाभते, तेच गुरुमाया जाणू शकतात. सृष्टीच्या निर्मितीची, पालनाची, संहाराची बाधा श्री गुरूंना नाही. म्हणूनच श्री दत्त अवतार चिरंतन आहे.
दत्तजयंतीनिमित्त
'श्री गुरुदेवदत्त' विशेष मालिकेचे साम वाहिनीवरून प्रसारण- दररोज रात्री साडेआठ ते नऊ.
पुनःप्रक्षेपण- दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा ते अकरा.
No comments:
Post a Comment