
दोन हजार दहाचा सप्टेंबर महिना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण महिना म्हणून समोर आला आहे. अकरा तारखेलाच ईद आणि श्रीचे आगमन असा दुग्धशर्करा योग आलेला आहे. गणेश उत्सव हा तरुणाईसाठी मोठा आवडता उत्सव. या दहा दिवसांच्या काळात तरुणाईचे मोठे शक्तीप्रदर्शन दिसून येते. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे हा उत्सव साजरा होत असल्याने तरुणाईच्या उत्साहाला एकच उधाण आलेले असते. स्वातंत्र्यपूर्व गणेश उत्सव आणि आजचा गणेश उत्सव यात मोठ्या प्रमाणात तफावत असली तरी आज आणि उद्यासाठीही गणेशोत्सवाची आवश्यकता भासणार आहे. देशातील युवापिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चालली आहे. आज गरज आहे ती भरकटत चाललेल्या युवापिढीला वाचविण्याची त्यांना योग्य दिशा देऊन राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची ! आमचा देश सर्वाधिक तरुणाचा देश म्हणून आज ओळखला जातोय. या तरुणाईच्या जोरावरच आम्ही उद्याच्या महासत्तेचा प्रपंच करतोय तेव्हा या युवा पिढीला अशा उत्सवांच्या माध्यमातून बांधील करुन एक समर्थ राष्ट्र निर्माण करण्याची आज गरज आहे. गणेश उत्सवासारखे उत्सव या कामी मोठे उपयोगी ठरु शकतात.
अनेक विद्यान आजच्या गणेश उत्सवावर टिका करतात. म्हणे तरुणाई बिघडली असा त्यांचा आक्षेप. निश्चित काही प्रमाणात आजच्या गणेश उत्सवाला काही प्रमाणात गालबोट लागले असले तरी एकामुळे सारेच नाशवंत ठरण्याची ही स्पर्धा पाहिली की कीव येते. आजही अशी अनेक गणेश मंडळे आहेत जी स्वातंत्र्यपूर्व गणेश उत्सवाच्या मर्यादेतच राहून आपला उत्सव उत्साहात साजरा करीत आहेत. यावेळी बारा दिवसांचा गणेश उत्सव आला आहे. मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु आज या उत्सवानिमित्ताने काही गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहणे गरजेचे आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होणे आज गरजेचे आहे. आज देशासमोर मोठ्या प्रमाणात आव्हाने आहेत. या आव्हानाचा विचार करुन आज गणेश उत्सव होणे आवश्यक आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या राजधानीत मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. संयम, शिस्त, बांधीलकी, राष्ट्रीय भावना याचा सुरेख मिलाफ यावेळी दिसून येतो. पण यावेळी पुण्यातील स्वाईन फ्ल्यू साऱ्या महाराष्ट्रभर पसरला आणि एकच धांदल उडाली. तेव्हा यावेळी स्वाईन फ्ल्यू सारख्या संकटाचाही विचार गणेश मंडळांना करावा लागणार आहे. महाराष्ट्रात सध्या विजेचा मोठा तुटवडा आहे तेव्हा उगीच दिव्याची आरास उभी करुन विजेचा तुटवडा वाढवू नये. यंदा महाराष्ट्रात पावसाने मोठी कृपा केली असली किंवा पिण्याच्या पाण्याचे संकट संपले असले तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात गोरगरीबांच्या घराची पडझड झाली आहे. अनेक निराधार कुटूंबे आहेत. अनेक आर्थिक विवंचनाग्रस्त, शिक्षणापासून वंचित मुले आहेत. ज्यांना आज आर्थिक मदतीची गरज असून त्या कामी काही मंडळे करु शकली तर आजचा उत्सव हा अधिक सार्थ ठरल्यासारखे होईल. आजच्या उत्सवात मध्यधुंद अवस्थेत नृत्य अविष्कारांचा मोठा नमुना पाहण्यास मिळत आहे. तेव्हा हाही टाळता आला तर हा उत्सव अधिक परिणामकारक ठरेल.
वृक्षारोपण सारखे सार्वजनिक उपक्रम हाती घेण्याचीही आज गरज आहे. निधीसंकलन करताना कुणावर जोरजबरदस्ती न करता ती एक चांगल्या विधायक कामासाठी वापरण्यात यावी. उत्सवप्रयीता ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना देश, काल, परिस्थिती ध्यानात ठेऊन तो साजरा करावा व तो आनंदात, शांततेत व सर्वांच्या सुखासाठी व्हावा. मंडळा-मंडळात स्पर्धा करुन किंवा एकमेकांविरोधात कुरबुऱ्या केल्याने आमची युवा शक्ती क्षीण होत जारणार असल्याने सर्वांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी गणेश उत्सवाचा उपयोग करावा. वाद्य किंवा डेकोरेशन यामुळे बऱ्याचदा तक्रार येतात तेव्हा ती वाजविताना मंडळांनी स्वत:च एक स्वत:ची आचारसंहिता करावी. या लहानसहान पण मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन उत्सव साजरे झाले तर ते का बरे कुणाला आवडणार नाहीत. धन्यवाद !
No comments:
Post a Comment